लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त दीपक पाटील यांनी सोमवारी मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर पाटील यांनी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त अजय लहाने यांची भेट घेऊन संवाद साधला. राज्य शासनाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकारी संवर्गातील पदावर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले दीपक पाटील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपायुक्तपदावर कार्यरत होते. अकोला मनपाच्या इतिहासात अतिरिक्त आयुक्तपदावर पहिल्यांदाच दीपक पाटील यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी सदर पद रिक्त होते. सोमवारी मनपात दाखल झाल्यानंतर पाटील यांनी पदभार स्वीकारला. महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्यासह महापालिका आयुक्त अजय लहाने यांची भेट घेऊन पाटील यांनी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्तपदावर पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे मनपाच्या प्रशासकीय कामकाजाला गती येण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. तूर्तास पाटील यांना उपायुक्त समाधान सोळंके यांचे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी पाटील!
By admin | Published: July 11, 2017 1:14 AM