अकोला : कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टिकोनातून रविवारी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान जिल्हा पोलीस यंत्रणेद्वारे ड्रोन कॅमेराद्वारे पेट्रोलिंग केली. या दरम्यान नागरिकांकडून १०० टक्के लॉकडाऊनचे पालन करण्यात आल्याचे ड्रोनच्या चित्रफितीवरून निदर्शनास आल्याची माहिती पोलीस विभागातर्फे देण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात २० फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजतापासून सुरू झालेले लॉकडाऊन २२ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजतापर्यंत लागू असणार आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस दलाकडून शहरातील गर्दीच्या ठिकाणी, महत्त्वाचे चौक, बाजारपेठ परिसरामध्ये ड्रोनद्वारे पेट्रोलिंग करण्यात आले. यावेळी नागरिकांनी लॉकडाऊनचे शंभर टक्के पालन केल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी लॉकडाऊनच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे करण्यात आले.
लॉकडाऊनदरम्यान पोलिसांकडून ड्रोनद्वारे पेट्रोलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:31 AM