- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आला असून, याचा गैरफायदा वन तस्करांकडून घेण्याची शक्यता असल्याने वन विभागाच्या जंगलात लागणारे वणवे तसेच शिकार रोखण्यासाठी आता वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लॉकडाउनच्या काळात जंगलात पायी गस्त घालणे अनिवार्य केले आहे. व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यातील वन विभागाच्या राखीव जंगलामध्ये आग लावण्याचे षडयंत्र वन तस्करांकडून आखण्यात येते. तसेच जंगलातील वृक्षांची अवैध कत्तल आणि त्यानंतर याच जंगलामधून लाकडांची अवैधरीत्या वाहतूक करण्याचा धोका एप्रिल आणि मे महिन्यात अधिक आहे. त्यामुळे राज्याचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी राज्यातील प्रादेशिक वन विभाग, वन्यजीव विभाग आणि व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या जंगलामध्ये कर्मचाºयांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून पायी गस्त घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या पृष्ठभूमीवर अधिकारी व कर्मचाºयांना अधिक सजग राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. वणवा नियंत्रणासाठी कर्मचाºयांना पायी गस्त घालताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे महत्त्वाचे आहे. यासोबतच मास्क वापरणेही गरजेचे असून, सॅनिटायझरही वारंवार वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.‘व्हीसी’द्वारे आढावा दरम्यान, वन विभागाच्या जंगलामध्ये राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा तसेच कोरोनाच्या संदर्भातील आढावा अधिकाºयांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वारंवार घेण्यात येत आहे. त्यामुळे वन तस्करांवर वन विभागाचे पूर्ण नियंत्रण असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे जंगलातील वृक्ष तसेच लाकूड सुरक्षित राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.वणवा तसेच शिकार रोखण्यासाठी वन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कार्यालयीन कर्मचारी कमी करण्यात आले असले तरी जंगलात मात्र पूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच लॉकडाउन झाल्यापासून वनसेवक व कर्मचारी पायी गस्त घालत असून, तशा प्रकारच्या सूचना त्यांना करण्यात आलेल्या आहेत.-पी. जे. लोणकर, उपवनसंरक्षक, वन विभाग, अकोला.