संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीवर मात करून, येथील अक्षय टेंभुर्णीकर या युवा बाक्सिंग प्रशिक्षकाने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संघाला पदकं मिळवून देऊन गगनाला गवसणी घातली आहे. जालंधर (पंजाब) येथे फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेत अमरावती विद्यापीठाने तब्बल नऊ वर्षांनंतर कांस्य पदक मिळवले आहे. सध्याचे प्रशिक्षक पातूर येथील अक्षय परमानंद टेंभुर्णीकर यांची नेमणूक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने केली. जुलै १७ मध्ये महाराष्ट्राची टीम राष्ट्रीय स्पर्धेसाठी गुवाहाटी (आसाम) येथे अक्षय टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली गेली होती. ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिपसाठी ही बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा झाली. या महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक तथा प्रशिक्षक टेंभुर्णीकर होते. या स्पर्धेत महाराष्ट्र तिसर्या क्रमांकावर राहिला. संघाने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य घेऊन हा संघ ऑगष्टमध्ये फिलिपाइन्स युरोप खंडात गेला. यामध्येसुद्धा एका खेळाडूला कांस्य पदक मिळाले. ज्युनिअर नॅशनल स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनकडून निवड करण्यात आली होती. अक्षय टेंभुर्णीकर या ३२ वर्षीय युवा कोचने इतिहास निर्माण करीत महाराष्ट्राला गौरव मिळवून दिला. अक्षय टेंभुर्णीकरची आर्थिक परिस्थिती मजबूत नसताना खेळासाठी नि:शुल्क आपले जीवन सर्मपित करून गरिबीत खितपत पडलेल्या मुला-मुलींच्या सुप्त गुणांना विकसित करून, त्यांना राष्ट्रीय स्तरापयर्ंत पोहोचवतात. स्वत: बेरोजगार राहून इतरांना नोकरीसाठी खेळाच्या दृष्टीने तयार करतात.अक्षयचं शिक्षण बीकॉम, बीपीएडपर्यंत झाले. बॉक्सिंग खेळाडू ते कोच असा प्रवास केला. ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले असून, त्यादृष्टीने ते परिश्रम घेत आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे ते ३ स्टार रेफरी आणि जज आहेत. २00८ पासून संघटनेच्या सोबत आहेत. सुवर्णपासून ते कांस्यपयर्ंत सहा ते सात पदकं राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र संघाने मिळवले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाला २५पेक्षा अधिक पदकं त्यांनी मिळवून दिले आहेत. विद्यापीठाचा बेस्ट रेफरी अवॉर्ड आजतागायत अक्षयच्या नावावर कायम आहे. उत्कृष्ट मुष्टियोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या यशाचे श्रेय अक्षयने आई आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. सतीशचंद्र भट, प्रमोद सुरवाडे, बीएफआयचे महासचिव जय कवळी यांना दिले.
शिर्ला येथे सुरू केली स्पोर्ट अँकॅडमी पातूरच्या शाळा, महाविद्यालयांनी सरावासाठी क्रीडांगण नाकारले. त्यामुळे त्यांना शिर्ला येथील सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अध्यक्ष सचिन कोकाटे यांनी शिर्लात क्रीडांगण उपलब्ध करून दिले. शिर्ला स्पोर्ट अँकॅडमीच्यावतीने विद्यार्थी ऑलिम्पिक स्तरावर नेण्याचा मानस अक्षयने व्यक्त केला.