पातूर : तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गणासह खानापूर, आलेगाव गणातील निवडणूक रद्द झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पातूर तहसीलदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च रोजीच्या निकालानुसार पातूर तहसीलच्या निवडणूक विभागाने शिर्ला जिल्हा परिषद सदस्य सुनील माणिकराव फाटकर, पातूर पंचायत समितीचे गटनेते तथा शिर्ला पंचायत समितीचे गणाचे सदस्य अजय ढोणे, पातूर पंचायत समितीतील विरोधी पक्षनेत्या तथा खानापूर पंचायत समिती गणाच्या सदस्य सुनिता अर्जुन टप्पे आणि पातुर पंचायत समितीच्या उपसभापती तथा आलेगाव पंचायत समिती गणाच्या सदस्य मोहम्मद नजमून्निसा इब्राहिम यांना अनुक्रमे तलाठी डी. के. देशमुख, शरद जामोदकर तलाठी एम.पी. नाईक, किशोर सोळंके यांच्यामार्फत सोमवारी पातूर निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे.
निवडणूक रद्द झाल्यामुळे शिर्ला जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण आणि खानापूर व आलेगाव गणात विद्यमान सदस्यांच्या गोटात नाराजी पसरली आहे. याउलट या निवडणुकांमध्ये वर्षभरापूर्वी पराभव झालेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
पातूर तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी राहणारा शिर्ला जिल्हा परिषद गट आहे. हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो. गतवेळी दुफळीमुळे मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात गेला होता. मात्र, वंचित बहुजन आघाडीने सुनील फाटकर यांना ऐनवेळी उमेदवारी देऊन मतदारसंघात विजय मिळविला होता. शिर्ला पंचायत समिती गण शिवसेनेचे अजय ढोणे यांनी जिंकला होता. खानापूर पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सुनिता अर्जुन टप्पे यांच्याकडे पातूर पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी होती. त्याबरोबरच काँग्रेस पक्षाच्या एकमेव उमेदवार मोहम्मद नजमून्निसा इब्राहिम सेना-काँग्रेस युतीमध्ये उपसभापतीपदाची जबाबदारी पार पाडत होत्या.
ओबीसी प्रवर्गाच्या पंचायत समितीतील तीनही सदस्यांकडे गटनेते विरोधी पक्षनेते आणि उपसभापती महत्त्वाची जबाबदारी होती. या गणातील निवडणूक रद्द झाल्याने पंचायत समितीत शिवसेनेकडे पाच आणि वंचित बहुजन आघाडीकडे चार असे पक्षीय बलाबल आहे. अनुसूचित जमातीसाठी पंचायत समितीचे सभापतीपद राखीव होते. या दोन्ही सदस्यांमध्ये ईश्वरचिठ्ठी काढून सभापतीपदी लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे विराजमान झाल्या होत्या. ठरल्यानुसार नंदू भिका डाखोरे हे सभापतीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे शिर्ला जिल्हा परिषद गटासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.