मागील दोन आठवड्यांत शुभम नामक युवकाचा व दाते नामक महिला धबधब्याजवळील डोहात बुडत असताना, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, रणजित गाडेकर नामक युवकाने डोहात उडी घेऊन दोघांचे प्राण वाचविले.
पातूर घाटाच्या सान्निध्यात वसलेल्या धोदानी पर्यटन परिसरात असलेल्या धबधब्याजवळील डोहात काही तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक तरुण बुडत होता. परंतु तेथील उपस्थित मित्रांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याचवेळी बाजूला झाडाखाली बसलेल्या गौरव सुरेश श्रीनाथ याने क्षणाचाही विलंब न करता, हवेने भरलेले ट्यूब त्याच्याकडे फेकले. परंतु या युवकाला ट्यूब पकडता आले नाही. त्यामुळे गौरवने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेऊन त्या युवकाचे प्राण वाचविले. मागील आठवड्यात धोदानी येथे अकोला येथील दाते परिवार आला होता. त्या परिवारातील एका महिलेचा पाय घसरून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून धबधब्याजवळील खोल पाण्यामध्ये पडली. यावेळी युवक रणजित गाडेकर याने पाण्यामध्ये उडी घेऊन महिलेला पाण्याच्या बाहेर काढले. अकोला येथील रहिवासी शुभम नावाचा मुलगा घसरून पडल्याने त्याचे सुद्धा प्राण रणजित गाडेकर यांनी वाचविले.
पर्यटन करा, पण जरा जपून!
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पातूरच्या जंगलासह डोंगरांचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलून गेले आहे. धोदानी धबधबासुद्धा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे परिसरातील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धोदानी धबधब्याजवळ डोह असल्याने, अनेकांना पाण्यामध्ये उतरण्याचा मोह आवरत नाही. परंतु अनेकांना यात जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे धोदानी धबधब्यावर येताना, पर्यटकांनी खबरदारी घ्यावी.