भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने १२ जानेवारी २०१५ ला माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सिंदखेडराजा विकास आराखड्याची घोषणा केली होती. दोन वर्षांत या आराखड्यातील कामे पूर्ण होणार असल्याचा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अद्यापही पहिल्या टप्प्यातीलच कामे अपूर्ण आहेत. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. माँ जिजाऊंचे हे स्थळ विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लक्ष देतील, अशी तमाम शिवप्रेमींची अपेक्षा आहे. तसे अभिवचनही नागपुरात २०१९मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देण्यात आले होते. पुरातत्त्व विभागाच्या प्रस्तावानुसार आता ३ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीसाठी पर्यटन मंत्रालयाकडे नव्याने मागणी करण्यात आली मात्र अद्यापही निधी मिळाला नाही. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्काळ २० कोटी रुपयांचा निधी रायगडसाठी देण्यात आला. हीच तत्परता सरकारने मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासासाठी दाखवावी, अशी अपेक्षा रामेश्वर पवळ यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शुक्रवारी लोणार भेटीवर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लोणार विकासाच्या धर्तीवर सिंदखेडराजाही विकसित होणार असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती रामेश्वर पवळ यांनी दिली.
………………………………………………………..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणारसोबतच मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा या वक्तव्याने बळावली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. पण, हा प्रश्न एवढ्यावर संपणार नाही. माँ जिजाऊंच्या जन्मस्थळ विकासासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करीत राहावे लागणार आहे. पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. विकासपूर्तीशिवाय स्वस्थ बसणार नाही.
रामेश्वर पवळ
राष्ट्रवादीचे नेते