अकोला: पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला सुरुवात झाली आहे. वृत्तपत्रांमधून शिक्षक भरतीच्या जातीच्या संवर्गनिहाय रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध होत असल्याने, अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण शिक्षकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक शिक्षकांना पवित्र पोर्टलवर त्यांच्या जात संवर्गानुसार २0 शाळांचे पर्यायी नावे निवडावी लागणार आहेत; परंतु पवित्र पोर्टलवर जात संवर्गनिहाय जागाच दिसत नसल्यामुळे २0 शाळा पर्याय म्हणून निवडायच्या कशा, असा प्रश्न इच्छुक शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. यासंदर्भात अनेक शिक्षकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचासुद्धा प्रयत्न केला.शिक्षक भरतीच्या वृत्तपत्रांमधून जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. इयत्ता पहिली ते आठवीसाठी टीईटी आणि टेट परीक्षा दिलेल्या आणि इ. नववी ते बारावीसाठी टेट परीक्षा दिलेल्या शिक्षकांना पवित्र पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. पात्र शिक्षक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी सज्ज आहेत; परंतु काय माहिती भरावी, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरच अर्ज कसा करावा, कोणती माहिती भरावी, यासंबंधी शिक्षण अनभिज्ञ आहेत. पवित्र पोर्टलवर रिक्त जागांच्या जाहिराती शिक्षण संस्थांनी भरल्या आहेत, तसेच वृत्तपत्रांमध्येसुद्धा जातीच्या संवर्गानुसार रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या शिक्षण संस्थांमधील राखीव व संवर्ग पाहून, पात्र शिक्षकांना पवित्र पोर्टलवर कागदपत्रांसह शैक्षणिक, वैयक्तिक माहिती भरावी लागत आहे. ज्या ठिकाणी उमेदवाराच्या जात संवर्गानुसार जागा उपलब्ध असतील. त्या शिक्षण संस्थांच्या २0 शाळा पर्याय म्हणून निवडाव्या लागणार आहेत; परंतु पवित्र पोर्टलवर जातीच्या संवर्गनिहाय जागाच दिसत नसल्यामुळे २0 शाळांचे पर्याय निवडावे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अर्ज भरणाऱ्या इच्छुक शिक्षकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधला; परंतु तेथून शिक्षक योग्य माहिती मिळत नसल्याने, शिक्षक हवालदिल झाले आहेत. (प्रतिनिधी)
माजी सैनिकांसाठी राखीव जागाशासनाने शिक्षक भरती करताना, माजी सैनिकांसाठी राखीव जागा ठेवल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. माजी सैनिकांमध्ये एमए. बीएड ही पात्रता असलेले किती उमेदवार मिळणे कठीण आहेत. त्यामुळे या जागा भरल्या गेल्या नाही तर या रिक्त जागा कशा भरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.सध्या सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे. त्यामुळे जातीच्या संवर्गनिहाय जागा दिसत नाहीत; परंतु आठवडाभरामध्ये शिक्षकांना त्यांच्या जातीच्या अमर्यादित जागा उपलब्ध होतील. आता २0 जागांचा पर्याय नाही, तर अमर्यादित जागा देण्यात येतील. शासन निर्णयानुसार माजी सैनिकांच्या जागा राखीव ठेवाव्या लागतात. या जागा भरल्या गेल्या नाहीतर खुल्या प्रवर्गातून त्या जागा भरल्या जातील.-विशाल सोळंकी, आयुक्त,शिक्षण विभाग