- संजय खांडेकरअकोला : महाराष्ट्र राज्य शासनाने दीर्घ प्रतीक्षेनंतर माध्यमिक आणि प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची भरती सुरू केली. केंद्रीय पद्धतीने सुरू झालेल्या या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज स्वीकृतीसाठी ३१ मे ही अंतिम तारीख ठेवण्यात आली असली तरी गत दोन-तीन दिवसांपासून उमेदवारांचे अर्ज, पवित्र पोर्टल ‘हँग’ होत असल्याने फेटाळले जात आहे. त्यामुळे हजारो उमेदवार त्रासले असून, अर्ज स्वीकृतीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.भाजप सत्तेवर आल्यानंतर शासकीय आणि खासगी शिक्षक भरतीवर प्रतिबंध घातला गेला. त्यामुळे राज्यातील अनेक डी.एड. आणि बी.एड. महाविद्यालये बंद पडली; मात्र डीएड-बीएड झालेले हजारो उमेदवार याआधीच बेरोजगार म्हणून फि रत आहेत. शिक्षक झालेल्या या बेरोजगारीची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने टीईटी परीक्षा घेतली होती. टीईटी उत्तीर्ण झालेले उमेदवार आता पवित्र पोर्टलवर अर्ज करण्यास पात्र ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्याच्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली; मात्र पवित्र पोर्टलवरील प्रीफरन्स लिस्ट दिसत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पवित्र पोर्टलवर अर्ज करण्यासाठी हजारो शिक्षक दररोज सायबर कॅफेचे उंबरठे झिजवित आहेत; मात्र त्यांना यश आलेले नाही. गत तीन दिवसांपासून सुरू पवित्र पोर्टल हँग होत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पोर्टलच्या क्षमतेसह अर्ज स्वीकृतीची तारीख राज्य शासनाने वाढवावी, अशी मागणी हजारो उमेदवारांनी केली आहे.- दररोज दहा ते पंधरा शिक्षक पवित्र पोर्टलवर अर्ज करण्यासाठी येत आहेत. मध्येच पोर्टल हँग होते, फार्म अपलोड होत नाही. प्रीफरन्स लिस्ट उघडत नाही. उघडली तर पूर्ण यादी येत नाही. या समस्या गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे उमेदवार कमालीचे त्रासले आहेत.-अनिल मानकर, सायबर कॅफे संचालक, अकोला.