अकोला: निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबविली होती; परंतु २६ मार्च रोजी शिक्षण विभागाची पुण्यात बैठक झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीईटी दिलेल्या शिक्षकांनी पसंतीक्रमानुसार त्यांच्या संवर्गाच्या शाळा निवडण्याची संधी पोर्टलवर देण्यात येणार आहे, तसेच संवर्गनिहाय अमर्याद जागा शिक्षकांना निवडता येणार आहेत. त्यानंतर मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.राज्यात १0 हजार शिक्षकांच्या भरतीच्या प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती. शिक्षण संस्थांच्या रिक्त जागांच्यासुद्धा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या; परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबविली; परंतु २६ मार्च रोजी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, संगणक तंत्रज्ञ बोलाविण्यात आले होते. बैठकीत ठरल्यानुसार शिक्षक भरती सुरू करण्यात येणार असून, पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना त्यांच्या जात संवर्गाच्या पसंतीक्रमानुसार अमर्याद शाळा निवडण्याची संधी दिली जाणार आहे. यासोबतच दिलेल्या सवलतींची माहितीसुद्धा पोर्टलवर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली झाली आहे. (प्रतिनिधी)