कापशी रोड ग्रा.पं.चा अभिनव उपक्रम : चिठ्ठी पद्धतीने होणार विजेत्यांची निवड
रवी दामोदर
अकोला : अकोला पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या कापशी रोड ग्रामपंचायतने घर कर व पाणी कर वसूल करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली असून, थकीत कर भरणाऱ्यांसाठी सोन्या, चांदीचे लाखो रुपयांची बक्षिसे असणारा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत कर भरणाऱ्यास ग्रामपंचायतीमार्फत १० ग्राम सोन्याचा नेकलेस, २५ ग्राम चांदीच्या तोरड्या, दोन ग्राम सोन्याचे कानातले व दोन डस्टबिन बक्षीस म्हणून मिळणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे ग्रामस्थ कर भरण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सरपंच अंबादास उमाळे यांनी सांगितले.
अनेक ग्रामपंचायतींकडे लाखो रुपयांचा कर थकीत असतो. त्यामुळे गावाच्या विकासास बाधा पोहोचते; मात्र अकोला तालुक्यातील कापशी रोड ग्रामपंचायतीने थकीत कर वसूल करण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामस्थांना थकीत कर भरण्याची सवय व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे सरपंच उमाळे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत सन २०२१-२२ या चालू वर्षाचा व थकीत असलेला पूर्ण कर १ एप्रिल ते ३० मे या दोन महिन्यांच्या कालावधीत भरणाऱ्यास ग्रामपंचायतमार्फत बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी चिठ्ठी पद्धतीने सर्व कर भरणाऱ्यांच्या चिठ्ठ्यांमधून एकूण ३ लाभार्थ्यास बक्षीस मिळणार आहेत. तसेच कर भरणाऱ्या सर्वांना दोन डस्टबिनचे वाटप केले जाणार आहे. याची सोडत ६ जून २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थ स्वत:हून कर भरण्यास समोर येत असल्याचे सरपंच उमाळे यांनी सांगितले. (ग्रा.पं.चा फोटो)
-----------------------------------------------
ग्रामस्थांना नेहमी कर भरण्याची सवय व्हावी, तसेच १०० टक्के कर वसुली झाल्यास शासनाच्या विविध योजनेंतर्गत ग्रामपंचायत पात्र ठरावी व गावातील विकासकामे करताना निधीची अडचण न व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
- अंबादास गजानन उमाळे, सरपंच, कापशी रोड, अकोला
----------------------------------------------------
स्वच्छतेसाठी पुढाकार!
गाव स्वच्छ ठेवल्याने उत्तम आरोग्य मिळते. त्यामुळे घरात ओला कचरा व वाळलेला कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी थकीत कर भरणाऱ्यास दोन डस्टबिनचे वाटप करण्यात येणार आहे. करदात्यास सोन्या, चांदीच्या बक्षिसासह डस्टबिन मिळणार आहेत.
------------------------------