लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित असलेल्या कारंजा येथील के. एन. महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन पेढीवाल यांनी पुण्यात आत्महत्या केली होती. ते प्रचंड मानसिक ताणात असल्याने त्यांनी प्राचार्य पदाचा राजीनामा दिला होता; मात्र सदर राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला नाही, तसेच तो मंजूरही करण्यात आला नसल्याने तणावात आलेल्या पेढीवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथील के. एन. महाविद्यालयात गजानन लक्ष्मीनारायण पेढीवाल (५४) हे प्राचार्य म्हणून कार्यरत होते; मात्र प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी १ जुलै २0१७ रोजीच प्राचार्य पदाचा राजीनामा दिला होता. सदर राजीनाम्यावर दिनांक टाकण्यात आली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली. सदर राजीनामा संस्थेच्या संचालक मंडळाची ७ जुलै राजी असलेल्या बैठकीमध्ये ठेवून तो मंजूर करावा की नाही, यावर चर्चा होणार होती; मात्र राजीनामा हा बैठकीसमोर ठेवण्यातच आला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एका संचालकाने १0 जुलै रोजी संस्थेला पत्र देऊन प्राचार्य पेढीवाल यांनी राजीनामा दिला होता का, दिला असल्यास तो संचालक मंडळाच्या बैठकीत का ठेवण्यात आला नाही, याचे उत्तर मागितले; मात्र संस्थेद्वारे सदर संचालकास उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे या संचालकाने पुन्हा एकदा २६ जुलै रोजी पत्र देऊन उत्तर मागितले; मात्र त्याच रात्री पेढीवाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आता पुण्यातील कोंढवा पोलीस तपास करीत असून, ते दोन वरिष्ठ संचालक कोण आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.
ते दोन वरिष्ठ संचालक कोण?प्राचार्य पेढीवाल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन वरिष्ठ संचालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. या प्रकरणामध्ये शरद चवरे आणि डॉ. भावे यांची नावे समोर आली होती; मात्र हे दोघेही वरिष्ठ संचालक नाहीत. चवरे हे कनिष्ठ संचालक आहेत, तर भावे प्राध्यापक आहेत, त्यामुळे चिठ्ठीत उल्लेख केल्याप्रमाणे ते दोन वरिष्ठ संचालक कोण आहेत, याचा तपास पुणे पोलीस आता नव्याने करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.