अकोला : राज्यभरात सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याची धडक मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत ‘पीसीपीएनडीटी’च्या पथकामार्फत जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून १६६पेक्षा जास्त सोनोग्राफी केंद्र आणि ८२पेक्षा जास्त गर्भपात केंद्रांची झाडाझडती घेण्यात आली. या तपासणीदरम्यान दोन सोनोग्राफी केंद्रांमध्ये कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत कार्यरत ‘पीसीपीएनडीटी’ विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील ३२पैकी २४ सोनोग्राफी केंद्र आणि १७पैकी १३ गर्भपात केंद्रांना भेट देऊन झाडाझडती घेतल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार यांनी दिली. तसेच महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने ११९पैकी ९२ सोनोग्राफी केंद्र आणि ७६पैकी ६९ गर्भपात केंद्रांची तपासणी केली. आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या या आकस्मिक तपासणीमुळे सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्र संचालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. शासनाच्या १३ जानेवारीच्या परिपत्रकानुसार, २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये राज्यातील सर्वच सोनोग्राफी केंद्र आणि गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत अकोल्यातही सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, दोन केंद्रांमध्ये कायद्यानुसार आवश्यक रेकाॅर्ड अद्ययावत ठेवण्यात येत नसल्याचे आढळून आल्याची माहिती आहे. या केंद्रांना ‘पीसीपीएनडीटी’च्या पथकामार्फत नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
...तर तुम्हाला मिळणार एक लाख रुपयांचे बक्षीस
प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान करणे हा ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यानुसार गुन्हा आहे. आपणास कुठेही अशाप्रकारचे कृत्य होताना आढळल्यास आपण १८००२३३४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता. ही माहिती देणाऱ्याला शासनाच्या खबऱ्या बक्षीस योजनेंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पटोकार यांनी दिली.
शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची तपासणी केली जात आहे. ज्या केंद्रांमध्ये कायद्याचे पालन होत नाही, अशा केंद्रांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. वंदना पटोकार, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला