अकोला: राज्यातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हंगेरीतील डेब्रीसीन विद्यापीठासोबत मंगळवारी सामंजस्य करार केला. या करारामुळे कृषीच्या उच्च शिक्षणासोबत व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत. हंगेरी येथील शिक्षण काळातील वास्तव्यादरम्यान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असून, दोन्ही विद्यापीठातर्फे अनेक शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.आंतरराष्ट्रीय धोरणानुसार विविध देशांतील विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. तसेच या विद्यापीठाचे विद्यार्थीसुद्धा कोरोनेल विद्यापीठ अमेरिका, टेक्सास टेक विद्यापीठ अमेरिका, युनिव्हर्सिटी आॅफ बॉयोलॉजिकल सायन्स, उझबेकिस्तानसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विद्यापीठाने नुकतेच इथोपिया देशातील वोल्काईट विश्वविद्यालय, सेंद्रिय शेती संशोधन संस्था, स्वीत्झर्लंड आदी संस्थांसह देशांतर्गत विविध संस्था, विद्यापीठासोबत सामंजस्य करार केले आहेत व याद्वारे अत्याधुनिक शेतीशास्त्र शिकण्यासाठी या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे.आता युनिव्हर्सिटी आॅफ डेब्रीसीन, हंगेरी या सर्व परिचित विद्यापीठासोबत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर आधारित आदान-प्रदान करार करण्यात आला. या करारांतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासोबतच व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे. डॉ. पंदेकृविच्या कुलगुरू कार्यालयातील सभागृहात संपन्न झालेल्या या करारावर विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी तर युनिव्हर्सिटी आॅफ डेब्रीसीन, हंगेरीच्यावतीने हंगेरी येथील कॉर्पोरेट कन्सल्टंट आशिष वेले यांनी स्वाक्षरी केल्या. या करारामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून, सेंद्रिय तथा एकात्मिक शेती पद्धतीतील नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान वैदर्भीय शेतीसाठी मोलाचे ठरेल, असा विश्वास डॉ. भाले यांनी व्यक्त केला.याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, नियंत्रक विद्या पवार, विभाग प्रमुख कीटकशास्त्र डॉ. डी. बी. उंदीरवाडे, डॉ. शशांक भराड व डॉ. के. जे. कुबडे, प्रा. एन. एस. गुप्ता, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय करार समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल करुणाकर, सदस्य डॉ. मंगेश मोहरील, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीप हाडोळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांची उपस्थिती होती.
अकोल्याच्या डॉ. पंदेकृविचा हंगेरीतील डेब्रीसीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 2:15 PM
अकोला: राज्यातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हंगेरीतील डेब्रीसीन विद्यापीठासोबत मंगळवारी सामंजस्य करार केला.
ठळक मुद्देराज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार हंगेरीत उच्च शिक्षणाची संधी! हंगेरी येथील शिक्षण काळातील वास्तव्यादरम्यान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार.दोन्ही विद्यापीठातर्फे अनेक शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.