८ मे रोजी रात्री ११ वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाने सुरुवात केल्याने शेतामध्ये असलेल्या भुईमुगाच्या शेंगा खराब झाल्या. कुटार मजूर वर्ग व शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
पाऊस अचानक आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमुगाचे खूप मोठे नुकसान झाले. मजुराने काढलेल्या शेंगा शेतातच पडून असल्याने पावसाने पूर्ण भिजल्याने पिकाचे नुकसान झाले. पाऊस आणखी दोन दिवस आला तर शेतकऱ्यांना भुईमुगाचे पीक व कुटार घरी आणावेच लागणार नाही. पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाल्याने शासनाने तातडीने सर्व्हे करून भुईमूग काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
भुईमूग काढणीसाठी मजूर मिळेनात
सौंदळा परिसरात वारी, वारखेड, पिंपरखेड, कार्ला शिवारातील शेतकऱ्यांची भुईमूग काढणीसाठी लगबग सुरू असून भुईमूग काढणीला मजूर मिळेनासा झाला आहे. मजुरांसाठी शेतकरी आपल्या नातेवाइकांना फोन करून मजूर आहेत का, अशी विचारणा करीत आहेत. भुईमूग काढणीसाठी आदिवासी बांधव काम करीत असून, तेल्हारा तालुक्यातील विविध गावांतून वाहनांद्वारे मजूर भुईमूग काढणीला येत आहेत; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मजूर वर्गातही भीतीचे वातावरण आहे. मजुरांअभावी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. भुईमुगाला ४५०० ते ५००० रु. भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भुईमुगाच्या कुटाराचाही खर्च निघत नसल्याचे चित्र दिसत आहे.