अकोला : तेलबियांचे पीक कमी असल्याने यंदा खाद्यतेल भडकले असून, भाव अजूनही आटोक्यात आलेले नाही. यामध्ये शेंगदाणा तेल म्हणजेच फल्ली तेल १५० रुपये किलोच्या दरात विक्री होत आहे. त्यामुळे १५० रुपये किलो पलीकडे शेंगदाणा तेल जाणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.यंदा उशिराने आलेल्या पावसामुळे सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान केले. त्याचा परिणाम तेलबियांच्या वाणाच्या उत्पादनवर पडला. खाद्यतेल बियांची आवक घटल्यामुळे खाद्यतेलाचे भाव सातत्याने वधारत आहे. सोयाबीन तेलाचे भाव वधारत असल्याने अनेक जण पुन्हा परंपरागत आपल्या फल्ली तेलाकडे वळले. फल्ली तेलाकडे ग्राहक वळू लागल्याने फल्ली तेल आता चक्क १५० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळे खाद्यतेलात सर्वात उंचीवर फल्ली तेलचे भाव गेले आहे. त्याखालोखाल सूर्यबी तेल असून, त्याचे भाव १०२ रुपये किलो असे आहे. सोयाबीन तेलाचे भाव ९६ रुपये किलो आणि राइस तेल ९५ रुपये किलो विकल्या जात आहे. मागील एका महिन्यात तेलाचे भाव कडाडल्याने अनेकांनी खाद्यतेल बदलले; मात्र एका पाठोपाठ प्रत्येक कंपनीने तेलाचे भाव वाढविले. त्यात शेंगदाणा तेल अधिकच महागले आहे.