लाेकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : शहरात गर्दी असलेल्या रस्त्यावर फुटपाथवर विक्रेत्यांचेच राज्य दिसते. महापालिकेचे कुचकामी ठरलेलेे फेरीवाले धाेरण, भाजी विक्रेत्यांसाठी बांधलेले ओटेही ओस पडल्याने या विक्रेत्यांनीही फुटपाथवरच बस्तान मांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्याचाच पर्याय निवडावा लागताे व फुटपाथवर विक्रेत्यांचेच राज्य दिसते.
सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या जठारपेठ चाैकात भाजी विक्रेत्यांनी मनमानीचा कळस गाठला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते अशाेक वाटिकेपर्यंतच्या दाेन्ही मार्गावरच्या फुटपाथवर खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात. हा मार्ग सतत रहदारीचा मार्ग आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरून जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी जात असतानाही काेणालाही याची फिकीर वाटत नाही. काही विक्रेत्यांनी तर चक्क रस्त्यावर दुकाने थाटली त्यामुळे वाहतुकीची काेंडी हाेत आहे.
कोरोना संसर्गाचा धोका
कोरोना संसर्गाचा धोका हा गर्दीच्या ठिकाणी सर्वाधिक आहे. फुटपाथवरच दुकाने थाटल्यामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजू गजबजलेल्या असतात. खुले नाट्यगृह ते फतेह चाैकापर्यंत रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. येथे फुटपाथाच नाही तर रस्ताही विक्रेत्यांनी व्यापून टाकला आहे
‘रस्ते का माल सस्ते में’ म्हणून ग्राहकांची गर्दी
दुकानांपेक्षा रस्त्यावर मिळणाऱ्या वस्तू तुलनेत स्वस्त मिळतात. त्यामुळे त्या वस्तूंचा दर्जा कसा आहे याची खातरजमा अनेक ग्राहक करत नाही. परिणामी रस्त्यावरच्या दुकानांमध्ये ग्राहकांची माेठी गर्दी दिसून येते.
अतिक्रमकांच्या विराेधात सातत्याने माेहीम सुरूच असते. फुटपाथ माेकळे राहिले पाहिजे हा प्रशासनाचा प्रयत्न असून, ज्या ठिकाणी फुटपाथवर दुकाने दिसतील ते हटविण्याचे निर्देश दिले जातील.
संजय कापडणीस, आयुक्त, मनपा