अकोला : बंदी असताना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करणे आणि अस्वच्छता पसरविणाऱ्या शहरातील पाच प्रतिष्ठानांवर अकोला महापालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली.प्लास्टिकपासून बनविल्या जाणाºया पिशव्या, थर्माकॉल आदी प्लास्टिक साहित्याचा वापरावर महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी घातलेली आहे. ही बंदी असतानादेखील अकोल्यातील काही प्रतिष्ठानांवर मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर सुरू आहे. सोबतच अनेक रेस्टॉरंट आणि भोजनालयात अस्वच्छता असते. मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्याने महापालिकेच्या पथकाने मंगळवारी शहरातील एम. एम. बार व रेस्टॉरंट, जैन भोजनालय, रीशी शॉप या प्रतिष्ठानांवर छापा टाकून प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. रेल्वेस्थानकाजवळील गुजराती स्वीट मार्टवर अस्वच्छता राखल्याबाबत दोन हजारांची दंडात्मक कारवाई केली. अल्टीमेट शॉपवरही ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी जितेंद्र पूर्वे, मनपा आरोग्य निरीक्षक कुणाल भातकुले, प्रशीष भातकुले, सोहम कुलकर्णी, वैभव चव्हाण, शुभम पुंड व निखिल कपले यांनी केली.