अकोला : भाडेतत्त्वावर (लीज) देण्यात आलेल्या जागांबाबत शर्तींंचा भंग करणार्या अकोला शहरातील ६७४ भाडेपट्टाधारकांवर महसूल विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात भाडेपट्टाधारकांची सुनावणी घेण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत निवासी आणि वाणिज्यिक प्रयोजनासाठी भाडेतत्त्वावर (लीज) नझूलच्या जागा स्थायी व अस्थायी स्वरूपात वापरासाठी दिल्या जातात. अकोला शहरात भाडेपट्टय़ाने देण्यात आलेल्या एकूण जागांची संख्या २ हजार ६८८ आहे. त्यामध्ये २ हजार १३५ स्थायी आणि ५५३ अस्थायी भाडेपट्टय़ांचा समावेश आहे. या भाडेपट्टाधारकांपैकी, ज्या कारणासाठी जागा भाडेपट्टय़ाने दिली, त्यासाठी जागेचा वापर न करता दुसर्याच इतर प्रयोजनासाठी भाडेपट्टय़ाच्या जागेचा वापर करणे तसेच भाडेपट्टय़ावरील जागा दुसर्याला विकण्याचा व्यवहार करून शर्ती व अटींचा भंग करणार्या शहरातील ६७४ भाडेपट्टाधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत भाडेपट्टाधारकांना अकोला उपविभागीय कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शर्तींंचा भंग करणार्या ६७४ भाडेपट्टाधारकांची सुनावणी शुक्रवार, ११ मार्च रोजी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. या सुनावणीत भाडेपट्टय़ावर देण्यात आलेल्या जागांसंदर्भात कागदपत्रांची तपासणी करून शर्तीचा भंग करणार्या भाडेपट्टाधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अकोला शहरातील ६७४ भाडेपट्टाधारकांवर होणार दंडात्मक कारवाई!
By admin | Published: March 11, 2016 3:05 AM