अकोला: उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाने विविध प्रकारच्या वाहनांची तपासणी करून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मोहिमच उघडली आहे. जानेवारी महिन्यापर्यंत भरारी पथकाने ११ हजार ८३२ वाहनांवर कारवाई करून ७६ लाख ६८ हजार १८४ रूपयांचा दंड वसुल केला. यातील सर्वाधिक दंड हा ओव्हर लोडिंग वाहनांकडून वसुल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहनांची नोंदणी, परवाना उपलब्ध करून देण्यासोबतच वाहनांशी संबधित कामे करण्यात येतात. शहरातील व जिल्हय़ात धावणार्या वाहनांची तपासणी करून वाहनाची वयोर्मयादा, फिटनेस, प्रदूषण प्रमाणपत्राची तपासणी आणि जड वाहनांची तपासणी करण्यात येते. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांकडील कागदपत्रांची तपासणी सुद्धा करण्यात येते. वाहनचालकांकडे कोणतेही कागदपत्रे नसल्यास, नियमांची पायमल्ली करणार्यांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येते. भरारी पथकामध्ये मोटारवाहन निरीक्षक, साहाय्यक मोटारवाहन निरीक्षक कागदपत्रांसह इतर संबधित बाबींची तपासणी करतात. एप्रिल २0१५ ते जानेवारी २0१६ पर्यंत आरटीओच्या भरारी पथकाने ११ हजार ८३२ वाहनांवर कारवाई केली. यात १२८0 वाहनांवर नोंदणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. नोंदणी प्रमाणपत्र सादर न करणार्या वाहनचालकांकडून भरारी पथकाने ७१ हजार ३00 रूपये दंड वसुल केला.
११८३२ वाहनचालकांकडून ७६.६८ लाखांचा दंड वसूल!
By admin | Published: February 16, 2016 1:35 AM