अकोला: आकोट आणि अकोला तालुक्यांतर्गत खारपाणपट्टय़ातील गावांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ८४ खेडी योजनेतून शेवटच्या गावापर्यंत पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहे. त्यातच लांबलेल्या पावसाचा फटकाही ५0 हजार लोकसंख्या असलेल्या ५0 गावांना बसला आहे. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतील टाकी आकोट येथे आहे. येथून चोहट्टा, मुंडगाव आणि तांदुळवाडीसह धनकवाडी या लाईनने पाणी सोडले जाते. त्यापैकी चोहट्टा, मुंडगाव आणि तांदुळवाडी या तीन लाईनवरील ३0 ते ३२ गावांमध्ये ३४ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जातो. धनकवाडी या एकाच लाईनवर ५0 पेक्षा अधिक गावांमधील ५0 हजारांच्यावर लोकसंख्या आहे. याच लाईनवर आकोट शहरातील दोन वार्डांनासुद्धा पाणीपुरवठा केला जातो. त्या तुलनेत या लाईनवर होणारा पाणीपुरवठा अनियमित आहे. पाणीपुरवठा अनियमित होण्याचा फटका योजनेच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दहिहांडा, गणोरी, वडद खुर्द, रोहणा, ब्रह्मपुरी, काटी, पाटी, केळीवेळी, ठोकवर्डी, जऊळखेड आदी गावांना बसला आहे. या गावांमध्ये भयंकर पाणीटंचाई आहे. आकोट येथील पाण्याच्या टाकीपासून केळीवेळीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी ७५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या गावापर्यंप पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.
नागरिक अनियमित पाणीपुरवठय़ाने त्रस्त
By admin | Published: June 29, 2014 12:35 AM