बोरगाव वैराळे: अकोला तहसील अंतर्गत येत असलेल्या धामणा गावात मागील सहा महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ गावालगतच्या पूर्णा नदीवरून पिण्यासाठी पाणी आणत होते; मात्र आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पूर्णा नदीत जाणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे आता पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. याला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी सरपंच चंद्रकला सावंग यांच्या घरावर मोर्चा काढून पिण्यासाठी नळ योजनेचे पाणी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली.धामणा व नवीन धामणा गावाला खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा केल्या जातो. गेल्या सहा महिन्यांपासून या गावात पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइनवर लिकेज असल्यामुळे पिण्याचे पाणी पोहचले नाही. या पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थ पिण्यासाठी पूर्णा नदीच्या पात्रातून पाणी आणत होते; मात्र पहिल्याच पावसात पूर्णा नदीपात्रात उंच कड्यावरून उतरणारा रस्ता वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी जीव धोक्यात घालून पूर्णा नदीचे पाणी आणावे लागत आहे. पूर्णा नदीचे पाणी आणताना भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीची दखल घेऊन धामणा येथील ग्रामस्थांनी सरपंच चंद्रकला सावंग यांच्या घरावर मोर्चा काढून तत्काळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावात पोहचविण्यासाठी साकडे घातले.
पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांनी काढला सरपंचाच्या घरावर मोर्चा
By admin | Published: June 24, 2017 5:54 AM