अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी केले.
मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसोबत ऑनलाईन पद्धतीने बुधवारी जिल्हाधिकारी पापळकर यांनी संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, ऑनलाईनव्दारे मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील नागरिकांना भेट देऊन कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोरोनाचे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने घरीच उपचार न घेता तातडीने चाचणी करून रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसेच लग्नप्रसंगाकरीता २५ व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली असून या नियमांचे पालन होत नसल्यास अशांवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता यंत्रणेला निर्देश द्यावेत.
तलाठी, ग्रामसेवक, आशावर्कर्स व कोतवाल या सर्व यंत्रणेंनी ग्रामीण भागात नियमित चाचण्या, संपर्क चाचण्या वाढवून बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ उपचार करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
०००००
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करणार
बालकल्याण समितीकडे दाखल करावे : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अकोला : आई किंवा वडील तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास किवा कोरोनाची लागण झाली असल्यास अशा १८ वर्षांखालील बालकांचे तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरुपाचे पुनर्वसन करता येईल. अशा पाल्यांचे अर्ज बाल कल्याण समितीकडे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून कोविड संसर्गामुळे पालकांना विलगीकरण किवा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केल्यामुळे बालकांच्या पालनपोषणाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच बालकांचे दोन्ही पालक मृत्यू झालेले आहेत अशा बालकांना बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत पालनपोषण व संरक्षण करण्यात येते.
जिल्हा व तालुकास्तरावर अशी बालके आढळून आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांनी बालकांचे शुभचिंतक या नात्याने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.