संग्रामपूर : मागील शैक्षणिक सत्रामध्ये मुल्यांकन होऊन अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांची यादी राज्याच्या शिक्षण विभागाने अद्यापही जाहीर न केल्याने ह्या सर्व शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे येत्या १ जुलैपासून राज्यातील कायम विना अनुदान तत्वावरील ऑनलाईन मुल्यांकनात पात्र ठरलेल्या राज्यातील जवळपास १२00 शाळा बेमुदत बंद करण्याचा इशारा कायम विना अनुदानीत शाळा कृती समितीने एका निवेदनाद्वारे दिला आहे. राज्यातील ११९0 शाळा आज राज्यभरात अनुदानाच्या उंबरठय़ावर आहेत. मुल्यांकन झाल्यावर पुढील दोन महिन्यात शाळांना अनुदान देण्याची नियमात तरतूद असतांना त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक समस्या निर्माण केली आहे.राज्यातील या सर्व शाळांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु करण्याची मागणीला गेल्या अनेक वर्षापासून केली आहे. मात्र, ह्या मागण्याकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अखेर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत शाळा कृती समितीने अनुदानाची मागणी पूर्ण होईपर्यंत येत्या १ जुलैपासून राज्यभरातील सर्व ऑनलाईन मुल्यांकनात पात्र ठरलेल्या कायम विना अनुदान तत्वावरील प्राथमिक व माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालये बेमुदत बंद राहतील. कृती समितीच्या या मागणीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक परिषद तथा शिक्षक आघाडीचे नवनियुक्त आ.श्रीकांत देशपांडे यांनी पाठिंबा दिला असल्याचे कळविण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कायम विनाअनुदानित शाळांचे, शाळा बंद आंदोलन
By admin | Published: June 28, 2014 10:33 PM