अकोला: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित वनक्षेत्रातून जाणार्या अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणास मंगळवारी राज्य वन्यजीव विभागाने मान्यता दिली. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे देशाच्या ह्यहृदयस्थानीह्ण असलेल्या या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. यामुळे कित्येक वर्षांपासून अलिप्त असलेली या मार्गावरील गावे आता देशाच्या नकाशावर येणार आहेत. अकोला ते खंडवादरम्यान मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला होता. कधी परवानगीअभावी, तर कधी निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी खासदार संजय धोत्रे यांनी पाठपुरावा केला. अकोला ते आकोटदरम्याच्या गेजपरिवर्तनासाठी रेल्वे प्रशासनाने यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ५६ कोटींचा निधी मंजूर केला. तर मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या वन्यजीव विभागानेसुद्धा या प्रकल्पाच्या विस्तारीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे विकासाचा एक नवी मार्ग प्रशस्त झाला आहे. विशेषत: वाणिज्यदृष्ट्या आकोट तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार असून, गेल्या कित्येक वर्षांपासून अलिप्त असलेली या मार्गावरील उगवा, पास्टुल, अडगाव बु., हिवरखेड, वानरोड, धुळघाट, डाबका, तुकईथड, आमला खुर्द, गुर्ही ही छोटी-छोटी गावे देशाच्या नकाशावर झळकणार आहेत.
वन विभागाच्या परवानगीमुळे विकासाचा मार्ग प्रशस्त
By admin | Published: April 11, 2016 1:28 AM