अकोला : वडील शेतमजूर, आईदेखील शेतात काम करते, घरात उच्च शिक्षणाचा कोणताही वारसा नाही अशा प्रतिकूल परिस्थितीवर केवळ जिद्द व मेहनतीच्या बळावर मात करीत शेगाव येथील महेश सुरेश डांगे या विद्यार्थ्याने अकोला येथे शिक्षण घेऊन अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आयआयटीमध्ये प्रवेश मिळविला आहे. जेईईई ॲडव्हान्स परीक्षेच्या गत १८ वर्षांतील सर्वांत कठीण पेपर असतानाही सातत्यपूर्ण अभ्यास व गुरुजनांनी 'समर्थ' साथ दिल्यामुळे ३,४१९ ऑल इंडिया रँक मिळवित आयआयटी गांधीनगर येथे केमिकल इंजिनिअरिंगला प्रवेश निश्चित करता आल्याचे महेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मूळचा संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री या छोट्याशा गावात जन्म झालेल्या महेशचे वडील सुरेश हे शेतमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. त्यांच्या कमाईवर दोनवेळच्या जेवणाचीही भ्रांत अशी परिस्थती असतानाही आई पार्वतीने महेशला इंग्रजी शाळेत टाकण्याचे ठरविले. वडिलांनीही पोटाला चिमटा काढत महेशला शेगाव येथील हरलालका कॉन्वेंटमध्ये टाकले. महेशला शिक्षणासाठी पैशांची कमी पडू नये म्हणून त्याच्या काकानेही प्रसंगी व्याजाने पैसे काढून वेळोवेळी मदत केली. दहावीत ९९ टक्के गुण मिळविल्यानंतर महेशने अभियांत्रिकीला जाण्याचे निश्चित केले. परंतु शेगावसारख्या ठिकाणी राहून ते शक्य नसल्याने व आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वडील सुरेश यांनी अकोला येथील समर्थ एज्युकेशनचे संचालक प्रा. नितीन बाठे यांचे दार ठोठावले. गुणी व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणाऱ्या प्रा. बाठे यांनी महेशमधील स्पार्क ओळखला व त्याला आपल्या महाविद्यालयात अकरावीमध्ये नि:शुल्क प्रवेश दिला. तीन वर्षे बाठे सरांच्या मार्गदर्शनाखाली जेईईई ॲडव्हान्सची तयारी केली. दिवसातील १४ ते १५ तास अभ्यास करणाऱ्या महेशने २७ सप्टेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या परीक्षेत ऑल इंडिया ३४१९ रँक प्राप्त करून महेशने आई-वडील व गुरुजनांचा विश्वास सार्थ ठरविला.
मेहनत पडली कोरोनावर भारी
गतवर्षी कोरोना संकट काळात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेगावात अडकल्यामुळे आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेकांनी घरातून बाहेर न पडण्यालाच प्राधान्य दिले. महेशने मात्र कोरोनाची भीती बाजूला सारत अकोला गाठले व जेईई ॲडव्हान्सची परीक्षा देऊन आयआयटीचे शिखर सर केले.
प्रा. बाठेंचे 'समर्थ' पाठबळ
महेशमधील गुणवत्ता हेरत प्रा. नितीन बाठे यांनी स्वत:च्या खिशातील एक हजार रुपये महेशच्या वडिलांना देत स्वत:च्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सांगितले. एवढेच नव्हे, तर महेशच्या राहण्याचीही व्यवस्था करून दिली. लॉकडाऊन काळात महेश शेगावमध्ये अडकून पडला होता. त्यावेळी त्याला अकोला येथे येण्यासाठी मदत केली. केवळ शिक्षणच नव्हे, तर प्रा. बाठे यांनी स्वत:च्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे महेशचे सर्व केल्याचे त्याचे कुटुंबीय मोठ्या अभिमानाने सांगतात.