अकोला - देशातील पेट्रोल-डिझलेच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असून महागाईनेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे, 2 रुपयांनीही इंधनाचे दर कमी झाले तरी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा वाटतो. एकीकडे इंधन दरवाढीवरुन सरकारसह नागरिकही त्रस्त असतानाच, आता केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ गुरुवारी येथे पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी, कृषी विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे हे उपस्थित होते. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, आता गाड्यांमध्ये विदर्भात तयार केलेल्या बायो इथेनॉलचा वापर होत आहे. विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन तयार करून ७० रुपये प्रतिकिलो विक्री होऊ शकते, याच्या अधिक वापरामुळे कोणी पेट्रोल-डिझेलचा वापर करणार नाही. पुढच्या पाच वर्षांत देशातील पेट्रोल हद्दपार होईल, आता फक्त गहू, तांदूळ, मका लावून कोणी भविष्य बदलू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता नाही, ऊर्जा दाता बनण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
नोकरी मागणारे नको, नोकरी देणारे बना
इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटीची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर असणार आहेत. विदर्भातील कापूस बांग्लादेशात निर्यात करण्याची योजना बनविली असून, याकरिता विद्यापीठांचा सहयोग आवश्यक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णत: थांबविण्यासाठी विद्यापीठ मोठे सहकार्य करू शकते. त्यामुळे नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बना, असेही ते म्हणाले. यावेळी सर्व विभागाचे अधिष्ठाता, कार्यकारी परिषदेचे सभासद यांचीही उपस्थिती होती.
‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित
कृषी विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित केले. यावेळी गडकरी यांनी ही पदवी स्वीकारत असताना मनात संभ्रम असल्याचे म्हटले. परंतु, कुलगुरू यांनी कार्यकारी परिषदेचा निर्णय सांगितला. त्यावेळी याबद्दल सन्मान व ऋण व्यक्त करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.