लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असल्यास त्याचे संयुक्त सर्वेक्षण करून, तसा अहवाल दहा दिवसांत शासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यासाठी पंचनामा केलेल्या शेताचा, पिकाचे नुकसान दर्शविणारा (जीपीएस एनेबल) फोटोही अपलोड करण्याचे बजावण्यात आल्याने पाहणी करणार्या प थकातील कर्मचार्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. जिल्हय़ात गुलाबी बोंडअळीने कापूस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक आंदोलने, धरणे करून शासनाला वेठीस धरल्यानंतर ५ डिसेंबर रोजी शासनाने राष्ट्रीय आणि राज्याच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत मिळण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून मागवले. त्यानुसार दहा दिवसांत सर्वेक्षण अहवाल आणि त्यासाठी मदतीचा प्रस्तावही मागवला आहे. त्यासाठी ७ डिसेंबर रोजी सर्वेक्षणाची पद्धतही ठरवून देण्यात आली. बोंडअळीने कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी संयुक्त पाहणी केली जाईल. त्यासाठी पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचा समावेश आहे. पथकाचा पंचनाम्यासह अहवाल तालुकास्तरीय अधिकार्यांकडून प्रपत्र अ, ब, क, ड मध्ये जिल्हाधिकार्यांकडे जाणार आहे. त्यावरून नुकसानाबाबत मदतीचा प्रस्तावही तयार होणार आहे.
तरच.. नुकसानाची मदत मिळण्याचा प्रस्ताव
पंचनामे करताना संबंधित कर्मचार्यांना पंचनामा होत असलेल्या ठिकाणाचा जी पीएस एनेबल अँपद्वारे फोटो काढावा लागणार आहे. त्याद्वारे नुकसानाच्या दाव्याची पडताळणी केली जाणार आहे. सोबतच नुकसान झाल्याचे ठरवण्यासाठी संबंधित िपकाची नोंद सात-बारावर असणे आवश्यक आहे. सोबतच पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यासच नुकसानाची मदत मिळण्याचा प्रस्ताव तयार होणार आहे.