अकोला : एक दिवसीय छायाचित्र प्रदर्शनात पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या फोटोग्राफीचा प्रवास उलगडण्यात आला. या प्रदर्शनात विविध विषयांवरचे १०० पेक्षा अधिक छायाचित्र ठेवण्यात आले होते. प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अकोला, बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने जानोरकर मंगल कार्यालयात ज्येष्ठ फोटोग्राफर ओलवे यांच्या डॉक्युमेंट्री, फोटोग्राफीच्या प्रदर्शनाचे आयोजन २९ फेब्रुवारीला करण्यात आले होते. या एक दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, मनपाच्या महापौर अर्चना मसने, आ. रणधीर सावरकर, तेजराव थोरात, जयंत मसने, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले, मनपा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांची उपस्थिती होती.ओलवे यांनी गत ३० वर्षाहून अधिक काळ समाजातील वंचित, बहिष्कृत, तळागातील घटकांचे प्रश्न आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रभावीरीत्या जगासमोर आणले आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन कलाकारांसाठी मोठी पर्वणी ठरले असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच ओलवे यांच्या कारकिर्दीवर संवाद सत्र घेण्यात आले. यामध्ये ओलवे यांनी फोटोग्राफी आवड, करियर, पॅशन, व्यावसायिक दृष्टिकोन, समाजभान आदींसंदर्भात मार्गदर्शन करून विविध प्रश्नांचे निरसन केले. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, नागरिकांनी भेटी दिल्या. प्रदर्शनासाठी अकोला, बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे, उपाध्यक्ष नीरज भांगे, दिग्विजय देशमुख, सचिव नितीन देशमुख, सहसचिव राहुल गोटे, दत्तात्रय सरोदे, उमेश चाळसे, कोषाध्यक्ष योगेश उन्होने, राहुल तायडे, पंकज शेळके, सोहेल खान, पवन खारोडे व मनीष शिंदे यांनी पुढाकार घेतला. प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचे व्याख्यानयाप्रसंगी प्रा. गौतमीपुत्र आप्पा कांबळे यांचे व्याख्यान झाले. प्रा. कांबळे यांनी ‘सेक्युलर आर्ट मुव्हमेंट’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अकोला, बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे पदाधिकारी व फोटोग्राफर्स उपस्थित होते.