शहर बगिचाचे सौंदर्यीकरण
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील शहर बगिचाचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. शिवाय, मॉर्निंग वॉकसाठी येथे ट्रॅकची निर्मिती करण्यात आल्याने अकोलेकरांसाठी हा बगिचा उपयुक्त ठरणार आहे. याच धर्तीवर शहरातील इतर बगिचांचे सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे.
ग्रंथालयातील उपस्थितीत घट
अकोला: स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बहुतांश युवक अभ्यासासाठी ग्रंथालयांना पसंती देतात. कोरोनामुळे मध्यंतरी ग्रंथालये बंद होती. अनलॉकदरम्यान ग्रंथालय सुरू करण्यात आले; परंतु कोरोनाच्या भीतीने बहुतांश युवक ग्रंथालयात अभ्यास करण्यास टाळत असल्याने ग्रंथालयात उपस्थितांमध्ये घट दिसून येत आहे. विद्यार्थी घरीच अभ्यास करण्यास पसंती देत आहे.
ऑनलाइन अभ्यासालाच पसंती
अकोला: गत आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्यात आल्या; परंतु कोरोनाच्या भीतीने पाल्यांना शाळेत पाठविण्यास अनेक पालकांची नापसंती असल्याचे शाळेतील पटसंख्येवरून निदर्शनास येत आहे. कोरोनाच्या भीतीपोटी पालक व विद्यार्थ्यांची ऑनलाइन अभ्यासालाच पसंती असल्याचे दिसून येत आहे.
एटीएममध्ये कोरोना संसर्गाचा धोका
अकोला: पैसे काढण्यासाठी लोक बँकांमध्ये गर्दी करण्याऐवजी एटीएमचा अधिक वापर करतात; मात्र शहरातील बहुतांश एटीएममध्ये कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सॅनिटायझरची सुविधा करण्यात आलेली नाही. त्यामुळे एटीएमच्या माध्यमातून कोरोनाचा वेगाने फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.