अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका युवतीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचर केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हा युवक फरार झाला आहे.
मोठी उमरी येथील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय युवतीला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथील रहिवासी प्रमोद गुलाब काटनकार हा जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत आहे. त्याने युवतीला नोकरीचे आमिष दाखवून तिचा वारंवार लैंगिक छळ केला. युवतीच्या नात्यात असल्याने युवतीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला; मात्र याच विश्वासाला तडा देत ग्रामसेवक प्रमोद कटनकार याने युवतीला ४ मे २०१८ रोजी रेल्वे स्टेशनवर बोलावून युवतीसोबत अनैतिक वर्तन केल्याची तक्रार युवतीने दिली. या तक्रारीनुसार त्याने युवतीला फेब्रुवारी २०२० मध्ये जालना येथे सोबत नेऊन त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या ठिकाणचे अश्लील छायाचित्र काढून युवतीला त्याव्दारे ब्लॅकमेल करीत तिला लैंगिक छळ सुरूच ठेवला. हा अत्याचार सहन न झाल्याने युवतीने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रमोद कटनकार याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.