राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने दिले पत्र, परमवीर सिंग यांच्यावर केलेल्या आरोपांची होणार चौकशी
अकोला : मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केले आहेत. यावरून भीमराज घाडगे यांची चौकशी करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अकोला पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले असून, १९ मे रोजी भीमराज घाडगे यांना मुंबई येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागासमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे सूचित केले आहे.
परमवीर सिंग ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराज गाडगे हे ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत होते. यादरम्यान परमवीर सिंग हे बड्या आरोपींना सोडण्यासाठी भीमराज घाडगे यांच्यावर दबाव आणत होते. तसेच पैशाची मागणी करीत होते. त्यांची मागणी पूर्ण न केल्याने भीमराज घाडगे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप त्यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. परमविर सिंह हे माजी पोलीस आयुक्त असताना सोन्याचे बिस्किट गिफ्ट म्हणून मागणे तसेच श्रीमंत व्यक्तींवर विनाकारण कारवाई करणे व त्या माध्यमातून पैसा गोळा करण्याचा गौरखधंदा त्यांनी सुरू केला होता. या प्रकाराला विरोध केल्यामुळे भीमराज घाडगे यांना सिंग यांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती. तसेच मानसिक छळही केला होता. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार भीमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. यावरून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने भीमराज घाडगे यांना १९ मे रोजी चौकशीसाठी मुंबई येथे बोलावले असून, तशा प्रकारचे पत्रही पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाले आहे.
परमवीर सिंग हे १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ या काळात ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठबळ देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पीआय भीमराज घाडगे यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बोलावण्यात आले आहे.
पत्नीच्या नावे उघडली कंपनी
परमवीर सिंग यांच्या पत्नी सविता यांच्या नावाने खेतान अँड कंपनी उघडली असून, या कंपनीचे कार्यालय इंडिया बुल मुंबई येथील इमारतीत आहे. त्या इंडिया बुल्स कंपनीच्या संचालक असल्याची माहिती असून, यामध्ये तब्बल ५ हजार करोड रुपयांची गुंतवणूक त्यांनी केल्याचे आरोप घाडगे यांनी केला आहे. तसेच या कार्यालयात जाण्यासाठी त्यांनी शासकीय वाहनाचा वापर करून त्यासाठी शासनाचा चालकही वापरल्याचा आरोप त्यांचा आहे.