अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण व शहर भाग मिळून एकून ४ लाख ४७ हजार ५४५ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीस्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानूसार भारतात १ ते १४ वर्ष वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाºया परजीवी जंतांपासून धोका आहे. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव हे याचे प्रमुख कारण आहे. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, शिवाय त्यामुळे बालकांची बौद्धिक व शारिरीक वाढही खुंटते. एन.एफ.एच. एस. च्या सर्वेक्षणानूसार महाराष्ट्रात कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या पाच वर्षाखालील बालकांची टक्केवारी ३४.४ टक्के आहे. तसेच १५ ते १९ वर्ष वयोगटातील ३० किशोरवयीन मुलांमध्ये, तर ५६ टक्के मुलींमध्ये रक्तक्षय आढळून येतो. १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळण्यात येतोे. त्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य खात्याच्या वतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. त्यासाठी अंगणवाडी कर्मचारी, शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जंतामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि रक्तक्षयाचे आजार बळावत आहेत. आजारामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.१५ फेब्रुवारीला मॉपअप मोहिमजिल्ह्यात सुमारे ४ लाख ४७ हजार ५४५ मुला-मुलींना १० फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळीचे वाटप करण्याचे नियोजन आहे. तसेच यादिवशी शाळेत गैरहजर असलेल्या मुलांसाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येईल. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग, अंगणवाडी, एकात्मिक महिला व बालविकास विभाग, शाळा, महाविद्यालयांशी समन्वय साधून पूर्वतयारी केली आहे.