खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत पिंपळखुटा-वाहाळा मार्गावर देशी दारूची अवैध विक्री सर्रास होत आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याकडे चान्नी पोलिसांनी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या परिसरात गेल्या काही महिन्यांपूर्वी देशी दारूची विक्री होत होती; गावातील अनेक वृद्ध व तरुण मंडळी दारूच्या आहारी गेल्याने नेहमी वादविवाद तंटे होत होते. महिलांनी दारू विक्री करणाऱ्याच्या घरी मोर्चा काढून चान्नी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनीही कारवाई केली होती. सद्य:स्थितीत पिंपळखुटा-वाहाळा बु. मार्गावर देशी दारूची सर्रास विक्री सुरू आहे. पोलिसांनी दखल घेऊन दारूविक्री बंद करावी, अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
पिंपळखुटा - वाहाळा बु. मार्गावरील छुपी दारू विक्री होत असेल तर त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
आदिनाथ गाठेकर, बीट जमादार, पोलीस स्टेशन, चान्नी.
चौ.
घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ!
पिंपळखुटा, चान्नी, चांगेफळ, राहेर, शिरपूर, आडगाव आदी गावे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. चोरी करणारी टोळी बुलडाणा जिल्ह्यातील असल्याचा अंदाज पोलिसांनी अनेकवेळा वर्तविला आहे. चोरणारी टोळी आधी मद्यप्राशन करून रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फेकून देतात नंतर घरफोड्या करून याच मार्गाने पसार होतात. परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.