अकोला: गुन्हा करण्याच्या उद्देशाने गुरूवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गिता नगरातील एमरॉल्ड कॉलनीत दुचाकींवर फिरणाऱ्या तिघांना जुने शहर पोलिसांनी पकडले असता, त्यातील एक युवक फरार झाला. दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक देशी पिस्तुल आढळून आले. दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ढोरबाजार वाशीम बायपास येथे कोंबिंग गस्त करीत असताना जुने शहरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, सागर कॉलनी बुद्धनगरी वाशीम रोड येथून एमरॉल्ड कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर अंधारात तीन युवक त्यांच्या जवळ पिस्तुल बाळगून आहेत.
याठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहिले असता दोन दुचाकींवर तीन युवक दिसून आले. पोलिसांना पाहून युवक पळून जात असताना, त्यांना पकडून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात देशी बनावटीचे स्टीलचे पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तुल जप्त केले. पोलिसांनी आरोपी विशाल सुरेश तायडे(३१), शुभम साहेबराव तायडे(२३) दोन्ही रा.नवीन हिंगणा वाशीम रोड यांना अटक केली. तिसरा आरोपी जॉकीभाई श्रीकृष्ण अहिर रा. नवीन हिंगणा वाशीम रोड हा फरार झाला. ही कारवाई ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रविंद्र करणकर, नापोका छोटू पवार, शैलेश पाचपोर, सागर शिरसाट, सनी सुरवाडे, पवन डांबलकर यांनी केली.