वाडी आदमपूर : तेल्हारा-वाडी आदमपूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावर अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच रुपेश राठी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सरपंच रुपेश राठी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वाडी अदमपूर-तेल्हारा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेल्हारा-वाडी अदमपूर-उकळीबाजार या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आले; परंतु वाडी अदमपूर गावापासून दोन किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा दोन किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. या रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच खड्डे बुजवण्यात आले होते, परंतु सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाहून वाडी अदमपूर, इसापूर, उकळी बु, उकळी बाजार ,वरुड वडनेर, वांगरगाव, बाभूळगाव, तळेगाव पा. आदी गावच्या ग्रामस्थांची ये-जा सुरूच राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. खड्डा चुकविताना नियंत्रण सुटल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. (फोटो)
-------------------------------
वाडी आदमपूर गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
- रूपेश राठी, सरपंच, वाडी आदमपूर.