संतोष येलकर
अकोला : शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या कामांचा आराखडा सादर करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांनी अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) २१ सप्टेंबर रोजी दिले.
खारपानपट्ट्यात शासनामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संचालक इंद्रा मालो यांनी, दि. १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान अकोला व अमरावती जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील विविध गावांना भेटी देऊन, प्रकल्पांतर्गत कामांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. त्यामध्ये अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्यांत खारपाणपट्ट्यातील १५ तालुक्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ढाळीचे बांध, शेतीला बांध बंदिस्ती, बांधावर गवताची लागवड, वृक्ष लागवड व शेततळी इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा आराखडा सादर करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांनी अकोला, बुलडाणा व अमरावती या तीनही जिल्ह्यांच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले.
खारपाणपट्ट्यातील जिल्हानिहाय
असे आहेत १५ तालुके !
जिल्हा तालुके
अकोला अकोट, तेल्हारा, अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर.
अमरावती अंजनगाव, दर्यापूर, भातकुली, चांदूरबाजार, अमरावती.
बुलडाणा मलकापूर, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद.
................................................................................................
अकोला, अमरावती व बुलडाणा या तीन जिल्ह्यांत खारपाणपट्ट्यातील १५ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतीला बांध बंदिस्ती, ढाळीचे बांध, बांधावर गवताची लागवड, वृक्ष लागवड व शेततळी आदी उपाययोजनांच्या कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालकांनी दिले. त्यानुसार संबंधित तीन जिल्ह्यांच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यात येणार आहे.
शंकर तोटावार
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.