अकोट : अकाेट शहरातील विकास कामांचे नियाेजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकाेट नगर परिषद कार्यालयाला दिलेल्या आकस्मिक भेटीत दिले, तसेच त्यांनी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.
त्यांनी फरकाळेनगर, राहुलनगर, जेतवननगर येथे भेट देऊन विविध ठिकाणी रस्ते, समाज मंदिरे, नाले बांधणीबाबत निर्देश दिले. जेतवननगर येथे जाण्यासाठी नाल्यावर पूल बांधून त्यांना अकोला रोडपर्यंत जाण्याच्या सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले, तसेच खानापूर वेस येथे व्यायामशाळा व वाचनालयाची सुविधा देण्याचे नियोजन केले. राहुलनगर येथे संत रोहिदास यांच्या नावे भव्य समाज भवन बांधण्याचे लोकांच्या मागणीलासुद्खा पालकमंत्र्यांनी संमती दिली. याकरिता सुशील पुंडकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
शिवाजी चौक येथील शिवाजी स्मारक येथे भेट देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी निधीची तरतूद केल्याचे सांगितले. यावेळी अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, बल्लू भाऊ, सुशील पुंडकर, विवेक बोचे, दिलीप बोचे मंचावर हजर होते, तसेच यावेळी निखिल गावंडे, कुलदीप वसू, तुषार पाचकोर, बल्ली राजा, समीर जमादार, निखिल दोड, अवी घायसुंदर, पवन बंकुवाले, चंदू दुबे, संदीप मर्दाने, आशिष गीते, तसेच व्यापारी वर्ग नगरपालिका येथे उपस्थित होते.