अकोला : शासनाच्या योजनांचा लाभ मोजक्या शेतकर्यांनाच मिळत असून, कोरडवाहू शेतकरी तथा कापूस उत्पादकांबाबत आजही पक्षपातच केला जातो. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत असल्याची खंत खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केली. तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ह्यअँग्रोटेक-२0१५ह्णचा समारोप २९ डिसेंबर रोजी करण्यात आला. कृषी विद्यापीठांनी केलेलं मोलाचं संशोधन जोपर्यंत शेतकरीभिमुख होत नाही, तोपर्यंत त्या संशोधनांना अर्थ नाही. याकरिता शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील संवाद वाढणे गरजेचे असून, शेतकर्यांना कृषी विद्यापीठ आपलंसं वाटावं यासाठीचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन यावेळी खासदार धोत्रे यांनी केले. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्यावतीने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ह्यअँग्रोटेक-२0१५ह्णचा समारोप २९ डिसेंबर रोजी करण्यात आला. याप्रसंगी खा. धोत्रे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. अमित झनक, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. किशोर बिडवे, प्रगतिशील शेतकरी नामदेवराव अढाऊ यांची उपस्थिती होती. धोत्रे यांनी कोरडवाहू शेतकर्यांची व्यथा मांडताना त्यांच्यावर कसा अन्याय होतो, यासंदर्भातील अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, सर्व योजना व अनुदान ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, अशा मोजक्याच शेतकर्यांना देण्यात येत असून, सत्तेत बदल झाला तरी प्रशासकीय यंत्रणा तीच असल्याने कोरडवाहू शेतकर्यांप्रति पक्षपात केला जात आहे. सोयाबीनचे दर गेल्या दहा वर्षांत तीन ते चार पटीने वाढले, पण कापसाचे दर कासव गतीने वाढत आहेत. परिणामी विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शेतकर्यांनी हे पीक सोडले होते, पंरतु बीटी कापूस आला आणि या बीटीने शेतकर्यांचं वाटोळे केले असल्याचे ते म्हणाले. आजमितीस पिकांचे उत्पादन वाढले, पण त्याला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो, परंतु आता अन्नधान्यातील पोषणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, हा धोका ओळखून यापुढे उत्पादन घ्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
योजना, अनुदानाचा लाभ मोजक्या शेतक-यांनाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 12:16 AM