सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असतानाच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान बालकांना राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरावर कोविडग्रस्त बालकांसाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यभरात कोविडग्रस्त बालकांसाठी खाटांचे नियोजन केले जात आहे. अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यात या अनुषंगाने ८८९ खाटांचे नियोजन केले आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयांमधील ५९९, तर खासगी रुग्णालयातील २९० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन खाटांचाही समावेश आहे. विभागात सर्वाधिक २२५ खाटांचे नियोजन वाशिम जिल्ह्यात करण्यात आले आहे.
अकोल्यात आणखी वाढणार खाटांची संख्या
अकोला जिल्ह्यात सद्य स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात ५०, तर मूर्तिजापूर ग्रामीण रुग्णालयात २०, अशा ७० खाटा, तर खासगी रुग्णालयांमध्ये ४५ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ८० खाटांचे नियोजन आहे. १ जून पासून सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोविडग्रस्त बालकांसाठी राखीव खाटांची संख्या ११५ वरून १८५ वर पोहोचणार आहे.
जिल्हानिहाय खाटांचे नियोजन
जिल्हा - शासकीय रुग्णालय - खासगी रुग्णालये - एकूण
अकोला - ७० - ४५ - ११५
अमरावती - ११० - ५५ - १६५
बुलडाणा - १०० - ७० - १७०
वाशिम - १०५ - १२० - २२५
यवतमाळ - २१४ - ०० - २१४
--------------------------------------------
एकूण - ५९९ - २९० - ८८९
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता विभागातील पाचही जिल्ह्यात कोविडग्रस्त बालकांसाठी आवश्यक खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. प्रशासन सज्ज असले, तरी पालकांनी बालकांची आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ