अकोला: गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) सोबतच १० टक्के रकमेपोटी उपलब्ध ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात करावयाच्या विविध विकासकामांचे नियोजन जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेच्या बैठकीत सोमवारी करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेचे अशासकीय सदस्य अभय बिजवे, सुनील अग्रवाल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. गौण खनिज स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) सोबतच १० टक्के रकमेपोटी गत जुलै अखेरपर्यंत जिल्हा खनिकर्म विभागाकडे ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध निधीपैकी ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात विविध विकासकामे करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींना श्रवण यंत्र, ट्रायसीकलचे वाटप, आदिवासीबहुल क्षेत्रात शाळा डिजिटल करणे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ‘आरओ प्लांट’ बसविणे आणि बंद पडलेल्या खदानींमध्ये जलपुनर्भरणाची कामे करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.आमदारांनी अशा मांडल्या सूचना!जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत विकासकामे शासनाच्या निर्देशाप्रमाणे व जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात यावी. तसेच लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होतील, यासंदर्भात दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना आमदार तथा जिल्हा खजिन प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेचे सदस्य गोवर्धन शर्मा यांनी पालकमंत्री तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान अध्यक्षांकडे पत्राद्वारे मांडली. तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेचे सदस्य हरिष पिंपळे यांनी पालकमंत्री तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान अध्यक्षांकडे पत्राद्वारे मांडली.