अकोला: ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार राज्यातील २९ जिल्ह्यात अद्यापपर्यंत उद्दिष्टाच्या ३० टक्केही लागवड झालेली नाही. त्यामुळे त्या जिल्ह्यांची कामगिरी लाल शाईत नोंदली जात आहे. तर पाच जिल्ह्यांमध्ये ३० टक्क्यांवर लागवड झाली आहे. त्याचवेळी कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृक्षलागवड ६० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची नोंद १५ जुलै रोजी झाली आहे. शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षीच्या पावसाळ्यात राज्यात ३४ कोटी ४९ लाख ९४ हजार ४२० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनाकडून ठरविण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाच्या विविध ५४ विभागांना जिल्हानिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. संबंधित यंत्रणांमार्फत राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करायची आहे. वृक्ष लागवडीसाठी यंत्रणाकडून खड्डे तयार करण्यात आले. ती संख्या ३२ कोटी ४७ लाख १० हजार ६५९ एवढी आहे. राज्यभरात सध्या पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्याचवेळी अनेक जिल्ह्यांमध्ये वृक्षलागवडीच्या मोहिमेकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच २९ जिल्ह्यांमध्ये गेल्या १५ दिवसातील लागवडीची आकडेवारी निराशाजनक असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पावसाळ््याच्या दिवसातच वृक्षलागवड जोमात होण्याची गरज आहे. त्याचवेळी गती मंद आहे. केवळ पाच जिल्ह्यांमध्ये वृक्षलागवडीची टक्केवारी ३० पेक्षा पुढे सरकली आहे. त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दोन जिल्ह्यातच म्हणजे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ती ६० टक्क्यांवर पोहचली आहे.
- राजधानी मुंबई शून्यावरच!राज्याचा कारभार चालवल्या जाणाऱ्या मुंबई शहरात वृक्षलागवड सुरूच झाली नाही. तर मुंबई उपनगरात ती ०.२९ टक्के असल्याची माहिती आहे. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात केवळ ६ टक्के, लातूर-९, सोलापूर, उस्मानाबाद-१३, नागपूर, जालना, बीड-१४, हिंगोली-१६, अकोला, धुळे-१७, औरंगाबाद, जळगाव-१८, गोंदिया-१९ टक्के वृक्षलागवड झाल्याची आकडेवारी आहे.