अकोला: वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यावर्षी ६५ लाख ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यातील वृक्ष लागवड सोमवार, १ जुलैपासून सुरू होत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ६५ हजार ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ५४ यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील ४ हजार ६० ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करायची आहे. त्यानुषंगाने वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांमार्फत खड्डे तयार करण्यात आले असून, वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीला १ जुलै रोजी प्रारंभ होणार असून, येत्या ३० सप्टेंबरपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते आज टिटवन येथे होणार प्रारंभ!जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा प्रारंभ १ जुलै रोजी सकाळी ८ वाजता बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवन व तिवसा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे सामाजिक वनीकरण विभागाचे अकोला विभागीय अधिकारी विजय माने यांनी सांगितले.