--------------------------
देवदरी येथील दिव्यांग कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित!
बार्शीटाकळी : तालुक्यातील देवदरी (वरखेड) येथील दोन्ही डोळ्यानी अंध असलेले लक्ष्मण भुसारी हे गेल्या तीन वर्षांपासून शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित आहेत. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे वारंवार अर्ज देऊन पाठपुरावा केला. एवढेच नव्हे, तर ग्रामविकास मंत्रालयाने भुसारी यांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेने कोणती कारवाई केली, त्याचा अहवाल पाठविण्याचा आदेश पत्राद्वारे दिला होता. परंतु मंत्रालयाच्या या पत्रालाच संबंधित विभागाने केराची टोपली दाखवली असून, अद्याप दिव्यांग कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे.
शासन निर्णयानुसार विविध अनुदानित शासकीय योजनेत दिव्यांगांसाठी टक्केवारी ठरवून देण्यात आली आहे. लक्ष्मण भुसारी यांना ग्रामपंचायतीने पात्र ठरवले असतानाही घरकुल योजनेत प्राधान्य दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या दिव्यांग कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी भुसारी यांनी केली आहे.
------------
दिव्यांग व्यक्तीस घरकुलाचा लाभ देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून यादीत नाव आले नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला नाही.
-रमेश पाटखेडे, ग्रामसेवक, देवदरी.
----------------------------
हाता येथील मुख्य रस्ता चिखलमय
हाता : बाळापूर पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या हाता हे गाव विकासापासून दूर असल्याचे चित्र आहे. गावामधील रस्त्यांवर सांडपाणी वाहत असल्याने रस्ते चिखलमय झाले आहेत. तसेच गावातील प्रमुख मार्ग असलेला स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात चिखलमय झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी मागणी होत आहे. (फोटो)