अकोला : कोरोनाकाळात रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने हे तिकीट पुन्हा १० रुपयांचेच करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या आप्तांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचे रिझर्वेशनही मिळत नसल्याची स्थिती आहे. मध्यंतरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, याकरिता प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता कोरोना रुग्णसंख्या घटत असून, निर्बंध शिथिल झाले आहे. त्यामुळे हे तिकीट पुन्हा दहा रुपये झाले आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई
२०१९-२०
४५ लाख
२०२०-२१
१,८५,००,०००
स्थानकातून दररोज जाणाऱ्या रेल्वे
२६
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या
१८००
प्रवासी वाढले!
कोरोनाकाळात कडक निर्बंध असल्याने सर्वकाही बंद होते. यावेळी रेल्वे चालू असल्यातरी प्रवासी मात्र कमी होते. बहुतांश व्यक्ती रेल्वेने प्रवास टाळत होते; परंतु राज्यात झालेल्या अनलॉकनंतर आता रेल्वे प्रवाशांची संख्या सर्व ठिकाणी वाढली आहे. त्यानुसार अकोला रेल्वेस्थानकावरही गर्दी वाढत आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.
तिकीट वाढले तरी...
कोरोनापूर्वी सर्वच स्थानकांवर दहा रुपये प्लॅटफॉर्म तिकीट होते. यानंतर कोरोनाकाळात प्लॅटफॉर्मचे तिकीट ५० रुपये झाले. त्यानंतर सध्या दहा रुपये केले आहे; मात्र याकाळात अकोला रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या कमाईला फटका बसला आहे. दरवाढ होऊनही अपेक्षित कमाई होऊ शकली नाही.