अकोला : भारतीय रेल्वेने अनलॉक अंतर्गत विशेष गाड्या चालवित प्रवासी वाहतूक खुली केल्यानंतर आता प्लॅटफॉर्मवरील प्रवेशही खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत अकोल्यासह काही निवडक रेल्वेस्थानकांमध्ये ११ मार्चपासून ५० रुपयांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार असून, ही सुविधा १० जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
कोरोना विषाणू महामारीच्या पृष्ठभूमीवर गतवर्षी रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत विशेष गाड्या चालवून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तथापि, या गाड्यांमधून केवळ कन्फर्म तिकिटावरच प्रवास करता येतो. या काळात फलाटांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटही बंदच करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोबत येणाऱ्यांना फलाटांवर जाता येत नव्हते. केवळ प्रवासाचे आरक्षित तिकीट असलेल्यांनाच फलाटांवर जाता येत होते. आता मात्र मध्य रेल्वेने काही रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ मंडळाअंतर्गत अकोला, शेगाव, बडनेरा, अमरावती, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड व खंडवा या रेल्वेस्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे. तथापि, त्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. फलाटांवर जाणाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.