गतवर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्णपणे नियमित झालेली नाही. अनलॉक प्रक्रियेअंतर्गत हळूहळू रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. सध्या विशेष गाड्या सुरू असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिटांवरच प्रवास करता येत आहे. गाडीत कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्यांसाठी आवश्यक असलेले प्लॅटफॉर्म तिकीट पूर्वी दहा रुपयांना मिळत होते. कोरोनाकाळात फलाटांवरील गर्दी कमी व्हावी यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर ११ मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये केली आहे. अकोला रेल्वेस्थानकावरून सध्या मुंबई-हावडा, मुंबई-गोंदिया, कोल्हापूर-गोंदिया, पुणे-नागपूर, अमरावती-सुरत, अहमदाबाद-हावडा, हैदराबाद-जयपूर, नांदेड-जम्मूतावी, यशवंतपूर-इंदूर यासारख्या ५० पेक्षा अधिक विशेष गाड्या धावत आहेत. या गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटांवर दररोज ४० ते ५० टक्के क्षमतेने प्रवासी असतात. तथापि, प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्यांमुळे फलाटांवरील गर्दीत भर पडत आहे. प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये झाल्यानंतरही गर्दीत विशेष फरक पडलेला नाही.
सध्या धावताहेत ५० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या
अकोला स्थानकावरून सध्या मुंबई-हावडा, मुंबई-गोंदिया, कोल्हापूर-गोंदिया, पुणे-नागपूर, अमरावती-सुरत, अहमदाबाद-हावडा, हैदराबाद-जयपूर, नांदेड-जम्मूतवी, यशवंतपूर-इंदूर यासारख्या ५० पेक्षा अधिक विशेष गाड्या धावत आहेत. पॅसेंजर गाड्या मात्र अजून सुरू झालेल्या नाहीत.
प्रवाशांची संख्या ५० टक्क्यांवर
कोरोना संसर्ग लक्षात घेता सर्व गाड्यांमधून केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येत आहे. त्यामुळे सध्या रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी दिसून येत नाही. अकोला रेल्वेस्थानकावरून पूर्वीच्या तुलनेत सध्या ४० ते ५० टक्केच प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत.
दररोज १५० ते २०० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री
अकोला रेल्वेस्थानक हे मुंबई ते कोलकाता या महत्त्वाच्या लोहमार्गावर असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या संख्येने ये-जा सुरू असते. या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येवर आता काही प्रमाणात मर्यादा आली असली, तरी दररोज साधारणपणे १५० ते २०० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होत आहे.
आई-वडिलांना सोडण्यासाठी आलो आहे. वय झाल्यामुळे त्यांना सामान चढविणे जमले नसते. यासाठी ५० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट काढून फलाटावर जावे लागले.
- कुणाल खैरे, अकोट
कोल्हापूरहून येत असलेल्या बहिणीला घेण्यासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसची वाट बघतोय. ताईसोबत लहान बाळ व बरेच सामान असल्यामुळे ५० रुपये मोजून फलाटावर जात आहे.
गणेश खोबरखेडे, अकोला