अकोला: महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०१९-२० करिता राज्यातील ११ क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश मिळणार आहे. याकरिता २४ जूनपासून खेळनिहाय कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहेत.२०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता राज्यातील एकूण ११ क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेशाकरिता सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्याकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याकरिता क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्य स्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू, ज्यांचे वय १९ वर्षांआतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ज्ञ समितीसमक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जाणार आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया २४ व २५ जून रोजी आयोजित केली आहे, तर खेळनिहाय कौशल्य चाचणी २५ व २६ जून रोजी आयोजित केली आहे. यानुसार आर्चरी खेळाची चाचणी क्रीडा प्रबोधिनी अमरावती, हॅण्डबॉल खेळाची चाचणी नागपूर येथे, बॉक्सिंगची चाचणी अकोला येथे घेण्यात येणार आहे. अॅथलेटिक्स, जलतरण, सायकलिंग, शुटिंग, ज्युदो, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक खेळाची चाचणी शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी-म्हाळुंगे, पुणे येथे घेण्यात येणार आहे.चाचणी देण्याकरिता येणाऱ्या खेळाडूंची चाचणीला जाण्यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (बॉक्सिंग) सतीशचंद्र भट्ट, राज्य क्रीडा मार्गदर्शक (कुस्ती) लक्ष्मीशंकर यादव यांच्याशी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई क्रीडांगण येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.