अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोलाद्वारे आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय ज्युडो क्रीडा स्पर्धा प्रभात किड्स स्कूल येथे १८ आॅगस्ट रोजी पार पडली. या स्पर्धेत प्रभात किड्सच्या ज्युडोपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले व विभिन्न वयोगटात तब्बल १४ प्रथम, तर चार द्वितीय क्रमांक मिळविले.१४ वर्षांआतील मुलींच्या विभिन्न वजनगटात प्रभातच्या ज्युडोपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून पुरस्कार मिळविले. मनीषा गाथे, बतुल अलमदार आणि राधिका हरणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर अश्विका तिवारी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांआतील मुलींच्या वजनगटात गायत्री धानोकार, प्रियंका सूर्यवंशी यांनी प्रथम, तर दीपा टाले हिने द्वितीय क्रमांक पटकावला.मुलांच्या १४ वर्षांआतील मुलांच्या विभिन्न वजनगटात मुंडे, अथर्व गायकवाड, साहिल खडवलकर, सुजन काकड यांनी विभिन्न वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला, तर साईस इंगळे याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांआतील मुलांच्या विभिन्न वजनगटात तनय उज्जनकर, अनिकेत चवरे, विश्वजितसिंग चरावंडे, परीक्षित बोचरे, प्रद्युम्न पाटील यांनी प्रथम क्रमांक, तर विश्वजित राठोड याने द्वितीय क्रमांक पटकावला.उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘प्रभात’च्या ज्युडो प्रशिक्षक किरण बुंदेले होत्या. अकोला जिल्हा ज्युडो असोसिएशनचे सचिव संदीप लाडीवकर, उपाध्यक्ष मनीष घाटोळे, सहसचिव विजय हळदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, ज्युडो क्रीडा प्रशिक्षक दीपक सिरसाट व प्रभातचे क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.या स्पर्धेत ग्रामीण भागातील चार, तर मनपा क्षेत्रातील २६ शाळा सहभागी झाल्या होत्या. जिल्हाभरातून विभिन्न वजनगटातून ११० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी मीनल थोरात, अनिल कांबळे, स्वप्निल मांदाळे, आशिष बेलोकार, निखिल जंगम, राहुल गजभिये, संजय पाटील, संतोष उगवेकर, रोहन गवळी व सचिन मुरूमकार यांनी प्रयत्न केले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे, प्राचार्य कांचन पटोकार, उपप्राचार्य वृषाली वाघमारे यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.