शिर्ला : गावाला अकोला- पातूर महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर गटारी निर्माण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शिर्ला येथील मुख्य चौकापासून- अकोला- पातूर महामार्गाला जोडणारा रस्ता खड्डेमय झाला आहे. हा रस्ता दोन्ही बाजूंनी उंच झाल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबले आहे. रस्त्याच्या दुतर्फा नाल्या नसल्याने रस्त्यावरच पावसाचे पाणी साचते. रस्त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शिर्ला गावाला जोडणारा या मुख्य रस्त्याचे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर अकोला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने थातूरमातूर डागडुजी करून रस्त्यावर खड्डे ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे रस्ता गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला असल्याचे फलक या रस्त्यावर फलक उभारले आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
--------------------
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शिर्ला येथील मुख्य रस्त्यावर गटाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावातील मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर वर्दळ सुरूच असते. परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-------------------
300721\img_20210730_062759.jpg
शिर्ला डांबरी रस्त्याची ऐशीतैशी